India replies to Trump with no half measures calls out American hypocrisy on Russian oil says…

India Replies To Trump Threat: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरुन भारतावर पुन्हा एकदा मोठा दंड लावण्याचा उल्लेख सोमवारी केल्यानंतर भारताने आता ‘पुरे झाले’ म्हणत थेट नाव घेऊन अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये एकूण सहा मुद्दे मांडण्यात आलं असून यामधून अमेरिकेबरोबरच युरोपीयन महासंघालाही सुनावण्यात आलं आहे. भारत आपलं राष्ट्रहित जपण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचं सांगतानाच अमेरिका कशाप्रकारे रशियाशी व्यापार करते याची पोलखोलच भारताने केली आहे.
भारताने काय म्हटलंय?
नवी दिल्लीमधून 4 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भारत सरकारने आपली बाजू अगदी भक्कमपणे मांडली आहे. “युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून रशियाकडून तेल आयात केल्याबद्दल भारताला अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून टीकेचा सामना करत आहे. खरं तर, संघर्ष सुरू झाल्यानंतर पारंपारिक इंधन पुरवठा युरोपकडे वळवण्यात आला म्हणून भारताने रशियाकडून तेल आयात सुरू केली. त्यावेळी, जागतिक ऊर्जा बाजारपेठेची स्थिरता मजबूत करण्यासाठी अमेरिकेने भारताकडून अशा आयातीला सक्रियपणे प्रोत्साहन दिले,” अशी आठवण भारताने करुन दिली आहे. पुढे भारताने अन्य पाच मुद्देही मांडले आहेत. हे मुद्दे कोणते ते पाहूयात…
1) भारत आयात करत असलेलं तेल हे भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात ऊर्जा उपलब्ध करुन देण्यासाठी किंमत सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने केली जातेय. जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीमुळे ही आयात आवश्यक आहे. मात्र भारत हे अधोरेखित करु इच्छितो की भारतावर टीका करणारे देश स्वतः रशियाशी व्यापारी संबंधांमध्ये आहेत. या देशांकडून केला जाणारा व्यापार हा कोणत्याही राष्ट्रीय हेतूसाठी काही बंधनांमध्ये केला जातोय असंही नाहीये.
2) 2024 मध्ये रशियासोबत युरोपियन युनियनचा वस्तूंच्या माध्यमातून होणारा द्विपक्षीय व्यापार 67.5 अब्ज युरो इतका आहे. शिवाय, 2023 मध्ये सेवांच्या माध्यमातून झालेला व्यापार 17.2 अब्ज युरो इतका आहे. त्या वर्षी किंवा त्यानंतरच्या वर्षात रशियासोबत भारताच्या एकूण व्यापारापेक्षा ही आकडेवारी प्रचंड मोठी आहे. 2024 मध्ये युरोपियन एलएनजी आयात विक्रमी 16.5 दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. हिच आयात 2022 मध्ये 15.21 दशलक्ष टनांच्या मागील विक्रमापेक्षा जास्त आहे.
3) युरोप-रशिया व्यापारात केवळ ऊर्जाच नाही तर खते, खाण उत्पादने, रसायने, लोखंड आणि पोलाद आणि यंत्रसामग्री आणि वाहतूक उपकरणांचादेखील समाविष्ट आहेत.
4) अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर, ते त्यांच्या अणु उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, त्यांच्या ईव्ही उद्योगासाठी पॅलेडियम, खते तसेच रसायने रशियाकडून आयात करत आहे.
5) या पार्श्वभूमीवर, भारताला लक्ष्य करणे अन्यायकारक आणि अविचारी आहे. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे, भारत त्यांचे राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करेल.