ऑनलाईन चोरीचा नवा फंडा; गुन्हेगार देतायेत घरबसल्या तरुणांना पैसे, कारण वाचून बसेल धक्का –…

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै : नोकरीचे आमिष देऊन लुटल्याचे अनेक प्रकार आजवर समोर आले आहेत. मात्र, शहरात नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक प्रकरणात आलेली एखादी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी युवकांच्या बँक खात्यांचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर भामट्यांमुळे आता पैसे ट्रान्सफर करणारा तरुणही पोलिसांच्या नजरेत गुन्हेगार ठरतोय. काय आहे नवीन सायबर घोटाळा? तक्रारदार बेरोजगार असल्याने, त्याने नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केला. त्याला संबंधित सायबर चोराने पैसे भरण्यासाठी सांगितले. मात्र, या युवकाने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. यानंतर संबंधित सायबर चोराने त्याला कमिशनवर काम करण्याबाबत विचारणा केली. युवकाने कामाबाबत विचारले असता, एका खात्यावरील किंवा ‘यूपीआय’वरून तुमच्या खात्यावर पैसे येतील. ते तुम्ही आम्ही दिलेल्या खात्यावर पाठवायचे, यासाठी तुम्हाला कमिशन मिळेल. ही ऑफर युवकाला योग्य वाटली. काही दिवसानंतर त्याच्या खात्यावर चाळीस हजार रुपये आले. ते जमा होताच, सायबर चोराने दुसऱ्या यूपीआयला ट्रान्सफर करण्याचे सांगितले. युवकाने सायबर चोराच्या सांगण्यावरून पैसे दुसऱ्या यूपीआयला ट्रान्सफर केले. हा व्यवहार होताच, काही तासानंतर त्याचे बँक खाते सील करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून युवकाने बँकेत जावून चौकशी केली असता, सायबर पोलिसांच्या तक्रारीवरून हे खाते सील केल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात येवून त्याच्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती दिली. सायबर पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पुढील यूपीआय असलेल्या ग्राहकासह पैसे ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया थांबविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. वाचा –
देशी कट्टा, 2 कार घेऊन मुंबईत कांड करायला आला, पण समोर होते पोलीस, पुढे काय घडलं असा एकच प्रकार नाही तर शहरात पाच ते सहा युवकांसोबत असा प्रकार घडल्याचे समोर आले असून, फसवणूक प्रकरणात या युवकांचा वापर करून त्यांनाही गुन्हेगार बनविण्याचा घाट सायबर चोरांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे बसलेल्या तरुणांच्या बँक खात्यावरून हे पैसे गेले असल्यामुळे एखाद्या प्रकरणातील गुन्हेगारीत या तरुणाचे बँक खातेसुद्धा ग्राह्य धरल्या जाते. त्यामुळे पोलिसांच्या नजरेत हाच गुन्हेगार असल्याचे सिद्ध होते. मात्र, प्रत्यक्षात याच तरुणांची फसवणूक झालेली असते, त्यामुळे पोलिसांची करवाईपासून दिशाभूल करण्यासाठी सायबर चोरट्यांनी आता हा मार्ग अवलंबवला असल्याचे सायबर निरीक्षकांनी सांगितले. वेगवेगळ्या पद्धतीने सायबर भामट्यांनी आता फसवणुकीला सुरुवात केली आहे. पोलिसांना देखील त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या कारवाईची दिशाभूल करण्याचा चंग आता या सायबर भामट्यांनी मांडला आहे. त्यामुळे सायबर भामट्यांना रोखणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.