अपराध

बायकोला माहेरी सोडायला गेला होता नवरा, स्टोशनवर दिलं विष? नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण


मुंबई, 28 जुलै : मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) : सध्याच्या काळात माणसा-माणसांमधले संबंध इतके विकोपाला जाऊ लागले आहेत, की माणसं कोणतंही पाऊल उचलायला मागे-पुढे पाहत नाहीत. त्यामुळे अनेक विचित्र, भयाण घटना घडत आहेत. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी (27 जुलै) अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. माहेरी आल्यावर 26 वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाला असून, शिक्षक पतीने तिला विष दिलं असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. मिर्झापूरमधल्या फरझाना खातून हिचा काही वर्षांपूर्वी मुर्शिदाबादमधल्या डोमकल इथल्या डोबापारामध्ये राहणाऱ्या निराबुल हक नावाच्या शिक्षकाशी विवाह झाला. विवाहानंतरही निराबुल आपल्या नोकरीच्या निमित्ताने हुगळीत श्रीरामपूरमध्ये राहतो. एका आठवड्यापूर्वी निराबुलने अचानक फरझानाला तिच्या वडिलांच्या घरून त्याच्या श्रीरामपूरच्या घरी नेलं. त्यानंतर त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. फरझानाच्या अन्य नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर गुरुवारी (27 जुलै) दुपारच्या सुमारास फरझानाने आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं, की ती लवकरच मिर्झापूरमधल्या बेलडांगा स्टेशनवर पोहोचेल. ते कळल्यावर तिची धाकटी बहीण तिला आणायला स्टेशनवर गेली. रेल्वे स्टेशनवर निराबुलने फरझानाला उतरवलं आणि कथितरीत्या तो गायब झाला. अनेक वेळा फोन करूनही त्याने काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे दोघी बहिणी मिर्झापूरमधल्या आपल्या घरी गेल्या. घरी पोहोचल्यानंतर थोड्या वेळातच फरझानाची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अति रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी सांगितलं. लग्न झाल्यापासूनच पती फरझानापासून अंतर ठेवूनच राहत होता. तसंच तिच्याशी वारंवार भांडणंही करायचा. फरझानाचे वडील कबिरुल इस्लाम यांनी सांगितलं, की तिचं आरोग्य उत्तम होतं. तिला कधी छोटासा आजारही झाला नव्हता. त्यामुळे, पतीने खाद्यपदार्थातून विष देऊन फरझानाची हत्या केली असावी, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. जावई विचित्र असला, तरी असं काही तरी करील असं वाटलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ही हत्याच असून, त्या हत्येचा तपास व्हावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. ‘मृत्यूचं नेमकं कारण कळण्यासाठी तिचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे,’ असं मुर्शिदाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुरिंदर सिंह यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button