महाराष्ट्र

Satara’s Historic Flag Hoisting at Jawahar Bag Completes 78 Years; The Same Glory Continues…


आज बरोबर ७८ वर्षे झाली या घटनेला. साताराच्या राजवाड्यासमोर जवाहर बागेतील राष्ट्रध्वज स्तंभावर हजारो लोकांच्या उपस्थितीत भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज डौलाने फडकू लागला. आणि त्याची साक्ष आजही तो राष्ट्र ध्वज स्तंभ सर्वांना देत आहे. आजही स्वातंत्र्यदिन, प

.

या राष्ट्र ध्वज स्तंभाच्या संदर्भातील अनेक आठवणी आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक जण स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. प्रतिसरकार मध्ये सहभागी होते. स्वातंत्र्य सैनिक, भूमिगत हे सातारा व परिसरात प्रभात फेऱ्या, मोर्चे, निदर्शने, पत्रके वाटणे ही कामे करत असत. त्यावेळी तरुण मुले, मुली स्वातंत्र्य प्रेमाने भारावून गेली होती. भारताला स्वातंत्र्य घोषित होताच १४ ऑगस्ट १९४७ ला रात्री बारा वाजता सातारा शहरातील रस्ते हजारो नागरिकांनी फुलले. ऐतिहासिक अशा जवाहर बागेमध्ये ( गोलबाग) त्यावेळी हजारो लोक जमले आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या व स्वतंत्र भारताच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्याचवेळी सातारा इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीने देणगी देऊन स्वातंत्र्ययुद्धात बलिदान पावलेल्या हुतात्म्यांची स्मृती जतन करण्यासाठी राष्ट्र ध्वज स्तंभ १५ ऑगस्ट १९४७ ला जवाहर बागेमध्ये उभारला. हा राष्ट्र ध्वज स्तंभ आजही दिमाखाने उभा आहे. आजही तिथे राष्ट्रध्वज असलेला तिरंगा फडकवला जातो. किल्ले अजिंक्यतारा येथेही ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद भारती यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता.

तर सातारच्या ऐतिहासिक राजवाडा परिसरातील याच जवाहर बागेत तिरंगा ध्वज फडकावून पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. पूर्वीपासूनच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, कार्यकर्ते याठिकाणी ध्वजारोहणासाठी येत असतात. येथे साताराच्या नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे. पुर्वी याठिकाणी स्वातंत्र्यसैनिक व्ही.एस. देवी, वसंतराव गोसावी, बाळासाहेब शिवदे, रामभाऊ औताडे, माजी नगराध्यक्ष रा.ना‌.उर्फ बन्याबापू गोडबोले, रा.बा उर्फ भाऊसाहेब जाधव, कोंडीराम सावकार- गवळी, तात्या झाड, उद्धवराव भस्मे , तात्या गाडेकर ,बुवा भांडवलकर , आबासाहेब कवारे, भाऊसाहेब जाजू, रामभाऊ जाजू , गुलाबभाई बागवान , शंकरराव कारंडे , राधाकाकी दोशी , वसंतराव पावसकर , बबनराव उथळे, ही साताऱ्यातील ज्येष्ठ मंडळी याठिकाणी ध्वजारोहणासाठी येत होती.

आता पुढची पिढी येथे आवर्जून येत असते. या बागेला गोल बागही असे म्हटले जाते. येथे प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यादिवशी सकाळी लाउड स्पीकरवर देशभक्तीपर गीते लावली जातात आणि हा लाउड स्पीकर व माईक पूर्वी स्मृतिशेष बाबुशेठ खंडेलवाल हे मोफत देत असत. तीच परंपरा त्यांचे चिरंजीव राजेंद्र खंडेलवाल यांनी सुरू ठेवली आहे. सातारा नगरपरिषदेच्या शाळेतील मुले-मुली झेंडा वंदन , ध्वज गित म्हणण्यासाठी येथे येतात.

रंगो बापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेत सशस्त्र लढा

सातारच्या थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढा पुकारला होता. तसेच रंगो बापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेत सशस्त्र लढ्याची तयारी झाली होती. यात अनेकांना हद्दपार करण्यात आलेले होते, काहींना फाशी देण्यात आली तर काहींना तोफेच्या तोंडी देण्यात आले व काहींना गोळ्या घातल्या गेल्या. कितीतरी जण भूमिगत झाले. या वीरांना प्रणाम करण्यासाठी १८५७ सालच्या स्वातंत्र्य समराच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट १९५७ ला थोरल्या प्रतापसिंह महाराजांचा पुतळा या जवाहर बागेत उभारण्यात आला. सातारा येथे थोरल्या प्रतापसिंह महाराज यांचा पुतळा उभारावा यासाठी मराठा मित्र मंडळ स्थापन करण्यात आले होते. त्यातही प्रबोधनकार ठाकरे व कर्मवीर भाउराव पाटील हे अग्रस्थानी होते. कर्मवीर भाउराव पाटिल व प्रबोधनकार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर स्वातंत्र्य सैनिकांची नावे लिहून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. हा राष्ट्र ध्वज स्तंभ व थोरल्या प्रतापसिंह महाराजांचा पुतळा नक्कीच सातारlच्या पुढील पिढीला स्वातंत्र्याच्या प्रेरणा देईल व हा राष्ट्र ध्वज स्तंभ १५ ऑगस्ट १९४७ ची आठवण कायम ठेवेल अशी खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button