टेलिव्हिजन गाजवणाऱ्या दोन अभिनेत्री एकाच वाहिनीवर; TRPमध्ये कोण देणार कोणाला टक्कर?

मुंबई, 29 जुलै : टेलिव्हिजनवर अनेक मालिका येतात आणि जातात. त्यातील काही हातावर मोजण्याइतक्याच मालिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. एखादी मालिका हिट होण्यामागे मालिकेचं कथानक आणि त्यातील कलाकार देखील महत्त्वाचे असतात. टेलिव्हिजनवर पसंती मिळालेल्या कलाकारांना प्रेक्षक कधीच दूर करत नाहीत. टेलिव्हिजनवरील अभिनेत्री प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अभिनेत्रींची लिस्ट फार मोठी आहे. पण त्यातील टॉप 2 अभिनेत्री आता एकाच वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दोघींनी टेलिव्हिजनवर जवळपास 4-6 वर्ष राज्य केलं आहे. त्या दोघी आता एकाच वाहिनीवर दोन वेगवेगळ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. टेलिव्हिजन गाजवणाऱ्या त्या अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी. स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुईनं टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. मालिकेत तिनं साकारलेली कल्याणी ही भुमिका तेव्हा चांगलीच गाजली. पुढचं पाऊल मालिकेमुळे कल्याणी घराघरात पोहोचली. 2011 ते 2017 या काळात पुढचं पाऊल ही मालिका टेलिव्हिजनवर सुरू होती. मालिकेचं कथानक वेळोवेळी बदलत राहिलं पण मालिकेच्या पात्रांमुळे प्रेक्षक मालिका शेवटपर्यंत पाहत राहिले. कल्याणी, अक्का साहेब, रूपाली अशी अनेक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरीची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली. हेही वाचा –
‘दिग्दर्शकाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्कार करायला हवा’; प्रसिद्ध मालिकेतील ‘त्या’ सीनवर भडकले प्रेक्षक
पुढचं पाऊल मालिकेनंतर जुई ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’, ‘बिग बॉस मराठी सीझन 1’ मध्ये दिसली. बिग बॉसमुळे देखील जुई प्रसिद्धीझोतात आली. जुई सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करतेय. कल्याणीप्रमाणेच जुईने आता साकारलेली सायलीही अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागील अनेक महिने टॉप 1 वर आहे. मालिकेनं नुकताच 200 भागांचा टप्पा पार केलाय. टेलिव्हिजन गाजवणाऱ्या दुसऱ्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे तेजश्री प्रधान. झी मराठीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून तेजश्रीला नवी ओळख मिळाली. तिनं साकारलेली जान्हवी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. तिचा ‘काहीही ह श्री’ हा डायलॉग ते जान्हवीचं मंगळसूत्र इथपर्यंत क्रेझ प्रेक्षकांमध्ये होती. 2013 ते 2016 या काळात होणार सून मी ह्या घरची ही मालिका टेलिव्हिजनवर सुरू होती. सात सासवांची एक सून अशी मालिकेची कथा प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती.
News18लोकमत
तेजश्री प्रधानने होणार सून मी ह्या घरची मालिकेनंतर ‘अग बाई सासूबाई’ ही मालिका केली. त्याचप्रमाणे ‘सूर नवा ध्यास नवा’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ती करत होती. मध्यंतरी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतही ती दिसली होती. त्यानंतर आता तेजश्री स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जुई गडकरी आणि तेजश्री प्रधान या दोन्ही टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अभिनेत्री एकाच वाहिनीवर प्राइम टाइमच्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुईची ठरलं तर मग ही मालिका संध्याकाळी 7 वाजता टेलिकास्ट होते तर तेजश्रीची प्रेमाची गोष्ट ही मालिका 4 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आता दोन्ही अभिनेत्री एकाच वाहिनीवर आल्यानंतर टीआरपीच्या शर्यतीत कोण वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.