महाराष्ट्र

Imtiaz Jaleel Alleges Land Scam: Shirsat Appointed CIDCO Chief to Push Deal, Ignored Objections…

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर सिडकोच्या जमिनीचा पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर, आता या वादात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली

.

इम्तियाज जलील यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, एका मोठ्या उद्योगपतीची सिडकोच्या या जमिनीवर नजर होती. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्ष बनवले. सिडकोच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, संजय शिरसाट यांनी दादागिरी करत हे काम कोणत्याही परिस्थितीत झालेच पाहिजे, असे आदेश दिले, असा दावा जलील यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांनी फाइलवरील नोटिंग्स दाखवाव्या

याआधीही इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्या बेकायदा मालमत्ता आणि एमआयडीसीतील भूखंड खरेदीचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यानंतर त्यांनी समाज कल्याण विभागातील दीड हजार कोटींच्या कथित टेंडर घोटाळ्याचा आरोपही केला होता. आताच्या प्रकरणात, जलील यांनी सिडकोला थेट इशारा दिला आहे की, सिडकोने या फाइलवरील नोंदी उघडपणे दाखवाव्या. अन्यथा, सिडकोचे अधिकारीही अडचणीत येतील.या आरोपांमुळे सिडको आणि राज्य सरकारची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

तात्काळ शिरसाटांचा राजीनामा घ्यावा- रोहित पवार

रोहित पवार यांनी आरोप केला आहे की, सिडकोचे अध्यक्ष झाल्यावर संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटी रुपयांची जमीन नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दिली. मराठा साम्राज्याशी गद्दारी करणाऱ्या या कुटुंबाला जमीन देऊन शिरसाट यांनी भुमीपुत्रांशीही गद्दारी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button