अपराध

धक्कादायक! रात्री शांत झोपला होता नवरा…बायकोनं हातपाय बांधून केले पाच तुकडे


गेल्या काही महिन्यांमध्ये खून करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये बायकांनी पुरुषांचे खून केलेल्या घटनांचं प्रमाणही जास्त आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक भयानक घटना उघडकीस आली आहे. पिलीभीतमधील एका महिलेनं आपल्या पतीला दोरीनं बांधून त्याच्यावर कुऱ्हाडीनं वार केलं. त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून ते गावाजवळील कालव्यात फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली असून, मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, गजरौला पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनगर गावात राहणारा रामपाल (वय 55 वर्षे) मंगळवारी सकाळपासून बेपत्ता होता. रामपालचा मुलगा सोमपाल पत्नी आणि मुलांसोबत गावातच एका दुसऱ्या घरात राहतो. रामपाल आणि त्याची पत्नी दुलारो देवी यांचे सतत वाद होत असत. दुलारो देवीची पती रामपालच्या एका मित्राशी मैत्री झाली. काही दिवसांपासून ती त्याच व्यक्तीसोबत राहत होती. महिनाभरापूर्वीच ती गावात परत आली होती.


News18लोकमत

बुधवारी दुलारो देवीनं वडील घरी नसल्याची माहिती आपल्या मुलाला दिली. त्यानंतर मुलानं बुधवारी गजरौला पोलीस स्टेशनमध्ये वडील बेपत्ता असल्याची तक्रार दिली. काही दिवसांपूर्वी त्याची आई परत आल्याची माहितीही त्यानं पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांना पहिला संशय दुलारो देवीवर आला. पोलिसांनी संशयाच्या आधारे गुरुवारी दुपारी दुलारो देवीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. कसून चौकशी केली असता तिनं पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. दुलारो देवीनं पोलिसांना सांगितलं की, रविवारी रात्री तिनं पती झोपलेला असताना त्याला बाजेला (लाकडी खाट) बांधलं आणि कुऱ्हाडीनं त्याच्या शरीराचे पाच तुकडे केले. यानंतर हे तुकडे गावाजवळील कालव्यात टाकले. दुलारो देवीच्या सांगण्यावरून पोलिसांनी संध्याकाळी उशिरा कालव्यातून रामपालचे रक्ताने माखलेले कपडे आणि बाज जप्त केली. सीओ अंशू जैन यांनी सांगितलं की, मृतदेहाचे तुकडे अद्याप मिळालेले नाहीत. कालव्याचं पाणी बंद केलं गेलं आहे. पाणबुडे शोधकार्यात मदत करत आहेत. आरोपी महिलेनं सांगितलं की, तिचा पती तिला मारहाण करायचा. त्यानं जमीन गहाण ठेवली होती. मुलीचंही लग्न करायचं होतं. रविवारी तिने एकटीनचं पतीची हत्या केली. या प्रकरणाची सर्वांगीण चौकशी केली जाईल. या हत्येत आणखी कोणाचा हात आहे का? हत्येमागचं खरं कारण काय आहे? या गोष्टींचा शोध घेतला जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button