मुंबई

विधानसभा विरोधी पक्षनेता कधी ठरणार? नाना पटोले यांनी एका वाक्यात संपवला विषय – News18 लोकमत


मुंबई, 28 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं आहे. पूर्वी हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्याकडे होतं. मात्र, ते पदाचा राजीनामा देऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही सत्ताधारी गोटात गेलेत. त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं आहे. विधानसभेत शिवसेनेकडे केवळ 15 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडेही 15 ते 20 आमदार असल्याचा दावा आहे. त्यामुळे आता विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. परंतु, काँग्रेसने अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही. यावर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणाले नाना पटोले? महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्यात विरोधी पक्षनेतेपदावरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी या नेत्यांना प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विरोधी पक्षनेते पदाबद्दल छेडले. त्यावर नाना पटोले म्हणाले, विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा असेल आणि लवकरच त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. वाचा –
मोठी बातमी! राहुल कुल यांना क्लीन चिट; संजय राऊतांना धक्का
पटोले म्हणाले, विधीमंडळाची एक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेनुसार ज्या पक्षाचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असतात, त्या पक्षाचा आमदार विरोधी पक्षनेता होतो. आज विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल. पुढच्या आठवड्यात तुम्हाला विरोधी पक्षांचा नेता पाहायला मिळेल. दरम्यान, विरोधी पक्ष नेते पदासाठी नाना पटोले सोमवारी दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. 15 दिवसांचं पावसाळी अधिवेश महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हे अधिवेशन मुंबईत पार पडत असून 15 दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, 17 जुलैपासून सुरु झालेलं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधक एकवटले असून राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. तर अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button