स्वास्थ्य

550 kg fake paneer in mumbai from antop hill what is cheese analogue


Fake Paneer In Mumbai: आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून गणेशोत्सव आणि सणासुदीची घाईगडबड हेरून मुंबई शहरात फसवणुकीचा एक वेगळाच पॅटर्न समोर आला आहे. नफेखोरांकडून पनीरऐवजी ‘चीझ अ‍ॅनालॉग’ या पनीरसदृश हलक्या पदार्थाची विक्री सुरू असल्याचं उघड झालं आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईतून ही गंभीर बाब समोर आली. अ‍ॅन्टॉप हिल परिसरात दोन डेअरींवर छापा टाकून तब्बल 550 किलो चीझ अ‍ॅनालॉग जप्त करण्यात आले असून खोट्या पनीरच्या माध्यमातून मुंबईकरांची फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे.

Add Zee News as a Preferred Source

कारवाईत कोणाकोणाचा सहभाग

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. अ‍ॅन्टॉप हिलमधील जीटीबी नगर परिसरात ज्या दोन डेअरींवर कारवाई करण्यात आली त्यांची नाव, ‘ओम कोल्ड्रींक हाऊस’ व ‘श्री गणेश डेअरी’ अशी आहेत. या दोन्ही डेअरींचे मालक पनीरच्या नावाखाली ‘चीझ अ‍ॅनालॉग’ची विक्री करत होते. सीबी कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते यांच्यासह सहायक पोलिस निरिक्षक रोहन बगाडे, महेश सांगळे, पोलिस उपनिरिक्षक नंदकिशोर बोरोले यांच्या पथकाने छापा टाकून दोन्ही डेअरीतून भेसळयुक्त पनीर जप्त केले.

कारवाईचा इशारा

हॉटेल, केटरिंग व्यवसायिक असे भेसळयुक्त पदार्थ स्वस्त दरात विकत घेतात. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ साठवणे किंवा विकणे टाळा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.

काय आहे ‘चीझ अ‍ॅनालॉग’?

‘चीझ अ‍ॅनालॉग’ हा पदार्थ चीझसारखाच दिसतो, मात्र तो दूधाऐवजी दुधाची पावडर, पाम तेल आणि रसायनांपासून बनवला जातो. जे लोक दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नाहीत किंवा टाळतात, त्यांच्यासाठी ‘चीझ अ‍ॅनालॉग’ तयार केले जाते. या पदार्थात प्रथिने, कॅल्शिअम व नैसर्गिक चरबीचे प्रमाण अत्यंत कमी असते. एफएसएसएआयच्या नियमानुसार, अशा पदार्थांवर ‘चीझ अ‍ॅनालॉग’ असा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक आहे.

ही घ्या काळजी

पनीर व दुग्धजन्य पदार्थ नेहमी विश्वसनीय ब्रँड व लेबल असलेल्या पॅकिंगमध्ये खरेदी करा.
सुट्टे/लेबल नसलेले पनीर खरेदी करण्याचे टाळा.
खरे पनीर हे दाणेदार असते आणि त्याला नैसर्गिक गंध असतो; तर बनावट पनीर मेणासारखे वाटते.

FAQ

चीझ अ‍ॅनालॉग म्हणजे काय?
चीझ अ‍ॅनालॉग हा चीझसारखा दिसणारा पदार्थ आहे, जो दूधाऐवजी दुधाची पावडर, पाम तेल आणि रसायनांपासून बनवला जातो. हा पदार्थ प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थ टाळणाऱ्यांसाठी तयार केला जातो. यात प्रथिने, कॅल्शिअम आणि नैसर्गिक चरबीचे प्रमाण खूप कमी असते.

चीझ अ‍ॅनालॉग आणि खऱ्या पनीरमध्ये काय फरक आहे?
खरे पनीर हे दूधापासून बनवले जाते, त्याला दाणेदार पोत आणि नैसर्गिक गंध असतो. चीझ अ‍ॅनालॉग मात्र कृत्रिम पदार्थांपासून बनवले जाते आणि त्याचा पोत मेणासारखा असतो. FSSAI नियमानुसार, चीझ अ‍ॅनालॉगवर तसा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक आहे.

मुंबईत चीझ अ‍ॅनालॉगच्या फसवणुकीची प्रकरणे कशी समोर आली?
गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल परिसरात गुन्हे शाखेने दोन डेअरींवर छापा टाकला. यात ‘ओम कोल्ड्रींक हाऊस’ आणि ‘श्री गणेश डेअरी’ या डेअरींमधून 550 किलो चीझ अ‍ॅनालॉग जप्त करण्यात आले, जे पनीरच्या नावाखाली विकले जात होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button