राजनीति

जरांगेंना आझाद मैदान रिकामे करण्याची पोलिसांकडून नोटीस

मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीतील आठ सदस्यांना नोटीस बजावून तातडीने आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात ठाण मांडले आहे. या आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. याच कारणामुळे पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीच्या 8 सदस्यांना नोटीस बजावली आहे.

कोअर कमिटीमध्ये किशोर आबा मरकड, पांडुरंग तारक, शैलेंद्र मरकड, सुदाम बप्पा मुकणे, बाळासाहेब इंगळे, ॲड. अमोल लहाणे, श्रीराम कुरणकर आणि संजय कटारे या सदस्यांचा समावेश आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याने आंदोलनाची परवानगी नाकारली

पोलिसांनी नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, आंदोलकांनी न्यायालयाने आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. याच कारणामुळे जरांगे पाटील यांनी मागितलेली आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे की, आंदोलनामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत आणि शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे, पोलिसांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या कोर कमिटी सदस्यांना तातडीने आझाद मैदान खाली करण्यास सांगितले आहे. यानंतर आंदोलक काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


हेही वाचा

“मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास न्यायालयात जाऊ”


जरांगे पाटील यांच्या निषेधासाठी खारघर जागेची शिफारस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button