Maratha Protesters Removed Mumbai Court Order Police Action | न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा…

मराठा आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातून बाहेर काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. येथील मराठा आंदोलकांची समजूत काढली जात असून कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे.
.
गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले, आम्हाला कोणतेही एक ठिकाण द्या, वानखेडे असेल, आझाद मैदान असेल आम्ही तिथे थांबू. आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. आमचा मुंबईकरांना त्रास देण्याचा उद्देश नाही. काल रात्री कोर्टाचा जो आदेश आला त्यानुसार मनोज जरांगे यांच्या शब्दाखातर सगळे मराठा आंदोलक नवी मुंबईला गेले आहेत.
आमची ही विनंती आहे, आम्हाला पार्किंगची सुविधा द्या, शौचालयाची सुविधा करावी तसेच आम्हाला फाइन लावू नये, अशी विनंती काळकुटे पाटील यांनी केली आहे. इथले वातावरण आमच्या गावाकडच्या लोकांना माहीत नाही. पावसामुळे कपडे सुकत नाही, त्यामुळे कुठेतरी आमची राहण्याची सोय करावी, अशी देखील मागणी गंगाधर काळकुटे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दक्षिण मुंबई तसेच इतर परिसरात जमले आहेत. याला न्यायालयाने आक्षेप घेत मुंबईमधून बाहेर जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जे कोणी मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांना मुंबईत न येण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत, मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात कुठल्याही पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे.
जरांगेंच्या आदेशाशिवाय जागा सोडणार नाही -आंदोलक
मुंबई हायकोर्टाने दुपारी तीन वाजेपर्यंत आंदोलकांनी मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिस सक्रीय झाले असून रस्त्यांवर उभी असलेली वाहने हटवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचाही प्रयत्न केला जात आहे. पण मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाशिवाय जागेवरून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.