हिंगोली जिल्हा परिषद इंजिनियरवर एकापेक्षा अधिक तालुक्यांचा भार घेतल्याबाबत चौकशीचे आदेश.

हिंगोली जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कार्यरत शाखा अभियंत्याच्या कामकाजाचे चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुढील चार दिवसांत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिले आहेत.
.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत कार्यरत शाखा अभियंता एस. बी. गिते यांना बांधकाम विभागाकडून एकाच वेळी तीन तालुक्याचा पदभार दिला आहे. यामध्ये त्यांच्याकडे हिंगोली, कळमनुरी व सेनगाव उपविभागाचा पदभार दिला असून याशिवाय जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता म्हणून काम पाहतात. एकाच अ.भियंत्याकडे तीन तालुक्याचा दिलेला पदभार चर्चेचा विषय बनला होता. विशेष म्हणजे बांधकाम विभागाच्या या निर्णयामुळे जिल्हयातील बांधकाम उपविभागात एकही सक्षम अभियंता नाही का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता.
विशेष म्हणजे एकाच अभियंत्याकडे तीन तालुक्याचा पदभार दिल्यानंतर बांधकाम विभागांतर्गत कामांची तपासणी कशी होणार तसेच गुणवत्ता कशी राखली जाणार असा सवालही उपस्थित होऊ लागला होता. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यपध्दतीवर चौफेर टिका होऊ लागली होती. या प्रकरणात समाज माध्यमांमधून वृत्त प्रसिध्द झाले होते.
त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी अभिंयता गिते यांच्या कामाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या बद्दल आलेल्या तक्रारींची चौकशी करून चार दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.